Craniotomy surgery

क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया

By Dr. Ravindra Patil

क्रॅनियोटॉमी ही एक शस्त्रक्रिया आहे, परंतु कोणत्याही एका विशिष्ट रोगावर उपचार करण्यासाठी नाही. क्रॅनिओटॉमी म्हणजे मेंदूच्या गाठीची शस्त्रक्रिया किंवा एपिलेप्सी शस्त्रक्रिया करण्यासाठी कवटी उघडणे. क्रॅनियोटॉमी या शब्दाचे दोन भाग आहेत: “क्रॅनिअम” आणि “ओटोमी”.

“क्रॅनिअम” हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. याचा अर्थ कवटी. आणि “ओटोमी” हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे आणि त्याचा अर्थ शरीराचा एक भाग कापून टाकणे असा होतो. बहुतेक एलोपथी वैद्यकीय संज्ञा लॅटिन आणि ग्रीक भाषेतील आहेत. अशाप्रकारे, गॅस्ट्रोटॉमी म्हणजे पोटा काढणे, फॅरिंगोटॉमी म्हणजे घशाची पोकळी काढणे. त्याच प्रकारे, क्रॅनिओटॉमी म्हणजे कपाळ किंवा कवटी काढणे.

मेंदूच्या या शस्त्रक्रियेमध्ये मेंदूमध्ये प्रवेश करण्यासाठी कवटीचा एक भाग काढून टाकला जातो. शस्त्रक्रिया झाल्यावर हाड परत लावले जाते. क्रॅनिओटॉमी मेंदूतील गाठ काढून टाकण्यासाठी, मेंदूतील एन्युरिझमवर उपचार करण्यासाठी, एपिलेप्सीवर उपचार करण्यासाठी, सेरेब्रल हॅमरेजवर उपचार करण्यासाठी, इंट्राक्रॅनियल प्रेशर कमी करण्यासाठी केले जाते. अशा शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन करतात.

भारतात मेंदूच्या शस्त्रक्रियेची किंमत

जेव्हा अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा उल्लेख केला जातो तेव्हा खर्चाचा विषय येतोच. मेंदूच्या शस्त्रक्रियांसाठी एक लाख ते पाच लाख किंवा त्याहून अधिक खर्च येऊ शकतो. पण हा खर्च आयुष्मान भारत योजना, आरोग्य विमा किंवा नियोक्त्याने (नोकरी देणार्यांनी) दिलेल्या सुविधा असे पर्याय आहेत. तुम्हाला वरीलपैकी कोणतेही फायदे नसल्यास, वैद्यकीय विमा खरेदी करणे अत्यंत उचित आहे.

क्रॅनिओटॉमीच्या आधीची तयारी

रुग्ण सुरक्षितपणे प्रक्रिया पार पाडू शकतो याची पुष्टी करण्यासाठी विविध चाचण्या केल्या जातात. त्या म्हणजे:

  • शारीरिक परीक्षा
  • रक्त चाचण्या
  • न्यूरोलॉजिकल परीक्षा
  • मेंदूचे इमेजिंग (सीटी स्कॅन किंवा एमआरआय)
  • वैद्यकीय स्थितीवर आधारित डोक्यावर नक्की कुठे ऑपरेशन करायचे ते ठरवणे

शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री, रुग्णाला उपाशी ठेवतात. डोक्याच्या केसांचे मुंडन केले जाते.

प्रक्रियेदरम्यान, रुग्ण ऑपरेटिंग टेबलवर झोपतो. मेंदूच्या कोणत्या भागावर ऑपरेशन केले जात आहे यावर रूग्णाची स्थिती अवलंबून असते. तुमच्या हातामध्ये इंट्राव्हेनस लाइन घातली जाते. रुग्णाच्या मूत्राशयात मूत्र कॅथेटर लावतात. आणि नंतर सामान्य भूल (जनरल एनेस्थेशिया) दिली जाते. कवटी उघडण्याची शस्त्रक्रिया म्हणजे क्रेनियोटॉमी सर्जरीचा चाकू, मेडिकल ड्रिल आणि करवतीने केली जाते. मग ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन, एपिलेप्सी सर्जरी किंवा ब्रेन हॅमरेज असा जो काही रोग असेल त्याची शस्त्रक्रिया करतात. मग सर्जन ताबडतोब किंवा काही महिन्यांनंतर वायर, टाके किंवा प्लेट्सच्या मदतीने काढलेला हाडाचा तुकडा परत कवटीला जोडतात. शेवटी त्वचेवर टाके घेऊन किंवा सर्जीकल स्टेपल्स लावून जखम बंद करतात. जखमेवर स्टराईल (निर्जंतुकीकरण केलेले) ड्रेसिंग ठेवण्यात येते आणि निर्जंतुकीकरण केलेली मलमपट्टी किंवा बॅंडेज बांधले जाते. क्रॅनियोटॉमी शस्त्रक्रियेसाठी सुमारे तीन ते चार तास लागू शकतात.

क्रॅनियोटॉमीचे प्रकार

क्रॅनियोटॉमीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराला शस्त्रक्रियेमध्ये वापरल्या जाणार्‍या तंत्र किंवा स्थानासाठी नाव दिले जाते.

स्टिरिओटॅक्टिक क्रॅनिओटॉमी

क्रॅनिओटॉमीमध्ये कवटीला स्टिरिओटॅक्टिक फ्रेमने फिक्स केले असल्यास आणि एमआरआय किंवा सीटी स्कॅन वापरल्यास, त्याला स्टिरिओटॅक्टिक क्रॅनिओटॉमी म्हणतात.

एंडोस्कोपिक क्रॅनिओटॉमी

एंडोस्कोपद्वारे कवटीच्या एका लहान चीराद्वारे केले जाते.

Table of Contents

जागृत क्रॅनियोटॉमी

रुग्ण जागृत असताना जागृत क्रॅनिओटॉमी केली जाते.

की-होल क्रॅनिओटॉमी

ब्रेन ट्यूमर काढून टाकण्यासाठी की-होल (शक्य तेवढ्या लहान छीद्रातून) क्रॅनिओटॉमी केली जाते. या शस्त्रक्रियेत कमीत कमी आकराची सर्जीकल जखम होते.

सुप्रा-ऑर्बिटल 'आयब्रो' क्रॅनिओटॉमी

सुप्रा-ऑर्बिटल म्हणजे डोळ्याच्या खाचांच्या वरची शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया मेंदूच्या पुढच्या भागात असलेला ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी केली जाते.

टेरोनिअल (फ्रंटो टेम्पोरल) क्रॅनिओटॉमी

कवटीत टेरिऑन म्हणजे कपाळाचे हाड आणि टेम्पोरल, स्फेनोइड आणि पॅरायटल हाडे एकत्र होतात ते ठिकाण. यात टेरिऑनचा भाग काढून टाकतात.

ऑर्बिटो-झायगोमॅटिक क्रॅनिओटॉमी

काठण्यास अवघड असलेले ट्यूमर आणि एन्युरिझम्सचा उपचार ऑर्बिटो-झायगोमॅटिक क्रॅनिओटॉमीद्वारे केला जाऊ शकतो.

शल्यचिकित्सक कवटीच्या ज्या हाडांमुळे चेहेर्‍याचा गोलाकार आकार येतो त्या हाडांचा काही भाग तात्पुरता काढून टाकतो. नंतर ती हाडे परत जोडली जातात.

पोस्टरियर फोसा क्रॅनिओटॉमी

हे ऑपरेशन कवटीच्या पायथ्याशी एका चीराद्वारे केले जाते.

ट्रान्सलेबिरिन्थाइन क्रॅनिओटॉमी

ट्रान्सलेबिरिन्थाइन क्रॅनिओटॉमीमध्ये, सर्जन कानाच्या मागे चीरा करून ऑपरेशन करतात.

बायफ्रंटल क्रॅनिओटॉमी

बायफ्रंटल क्रॅनिओटॉमी, किंवा विस्तारित बायफ्रंटल क्रॅनिओटॉमी, पुढच्या मेंदूतील काढण्यास कठीण ट्यूमर काढण्यासाठी केली जाते.

क्रॅनिओटॉमी का केली जाते?

भारतात ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च विविध योजनांद्वारे सर्वांना परवडणारा होत असल्याने, या शस्त्रक्रिया अनेकदा केल्या जातात. मेंदूच्या खालील रोगांवर उपचार करण्यासाठी क्रॅनिओटॉमी केली जाते:

  • ट्यूमर
  • एन्युरिझम
  • संसर्ग
  • सूज (सेरेब्रल इडिमा)
  • कवटीच्या आत रक्तस्त्राव
  • रक्ताची गुठळी
  • मेंदूत संक्रमण व पस होणे
  • कवटीचे फ्रॅक्चर
  • ड्युरा मॅटर फाटणे
  • धमनी विकृती
  • आर्टिरिओव्हेनस फिस्चुला
  • इंट्राक्रॅनियल दाब वाढणे
  • अपस्मार (एपिलेप्सी)
  • पार्किन्सन रोगासारख्या सतत होणार्‍या हालचालीच्या विकारांसाठी उपकरणे रोपण करणे.

ब्रेन ट्यूमर काढून टाकल्यानंतर सहसा बायोप्सीसाठी पाठवले जाते. भारतात ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेचा खर्च बहुतेक लोकांना वाटतो तितका जास्त नसतो.

क्रॅनिओटॉमी जोखीम व दुष्परिणाम

रुग्णाची विशिष्ट मेंदूची शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय स्थिती आणि अनेक इतर घटक यावर दुष्परिणाम होणे आवलंबून असते. संभाव्य दुष्परिणाम खालील प्रमाणे असतात:

  • डोक्यावर जखमांचे व्रण
  • कवटीची हाडा काढल्यामुळे दिसणारा खड्डा
  • डोक्यात उपकरणे लावल्यामुळे दुखापत
  • चेहऱ्याच्या मज्जातंतूचे नुकसान
  • सायनसचे नुकसान
  • हाडांच्या काढलेल्या भागात किंवा त्वचेत संसर्ग
  • दौरे (फेफरं येणे)
  • मेंदूला सूज
  • सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडची गळती
  • स्नायू कमकुवत होणे
  • स्ट्रोक

क्वचितच, क्रॅनिओटॉमीमुळे असे ही होऊ शकते:

  • बोलण्यात समस्या
  • स्मृती समस्या
  • चालतांना तोल राखण्याची समस्या
  • लकवा
  • कोमा

क्रॅनियोटॉमीमुळे सर्वसामान्य शस्त्रक्रियेमुळे होणारे दुष्परिणाम देखील होऊ शकतात, जसे की:

  • रक्तस्त्राव
  • रक्ताच्या गुठळ्या
  • न्यूमोनिया
  • जनरल ऍनेस्थेसियाचे दुष्परिणाम
  • अस्थिर रक्तदाब

या सर्व दुष्परिणामांविषयी सर्जन स्वताःच जास्त माहिती देऊ शकतात.

क्रॅनियोटॉमी नंतर बरे होण्याची प्रक्रिया

शस्त्रक्रियेनंतर लगेच रुग्णाला रिकव्हरी युनिट किंवा अतिदक्षता विभागात [ICU] नेले जाते. नर्सेस सतत रुग्णाच्या जीवनावश्यक गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतात कारण रूग्ण हळूहळू एनेस्थेशियाच्या परिणामातून बाहेर पडतो. त्यानंतर रुग्णाला वेगळ्या खोलीत नेले जाते. रुग्णालयात मुक्काम शस्त्रक्रियेच्या प्रकारावर अवलंबून असतो. परंतु सहसा एक आठवडा तरी रहावेच लागते.

या महत्त्वपूर्ण बरे होण्याच्या कालावधीत:

  • सूज टाळण्यासाठी डोके उंचावले जाते
  • ऑक्सिजन दिला जातो
  • न्युमोनिया टाळण्यासाठी खोल श्वास घेण्याचे व्यायाम आणि स्पायरोमेट्री शिकवली जाते
  • पायांभोवती विशेष टूर्निकेट्स बांधतात. त्या मध्ये हवा आलटून पालटून भरली जाते व बाहेर टाकली जाते. यामुळे पायांच्या स्नायुंना मसाज मिळतो व हे शिरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते.
  • युरिनरी कॅथेटर अनेक दिवस मूत्राशयात ठेवतात.
  • मेंदू आणि शरीराची कार्ये तपासण्यासाठी वारंवार न्यूरोलॉजिकल तपासणी केली जाते.

रूग्णाला डिस्चार्ज मिळून घरी जाणे

क्रॅनियोटॉमीनंतर, डोक्याच्या जखमेची काळजी घेणे आवश्यक आहे. वेदना बरे होईपर्यंत आणि संसर्ग प्रतिबंधासाठी औषधे घेणे आवश्यक आहे. बरे व्हायला किमान सहा आठवडे लागू शकतात. रुग्णाने दैनंदिन नियमित क्रियाकलाप करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे जसे की:

  • चालणे
  • बोलणे
  • ज्या क्रियाकलापांसाठी शक्ती आवश्यक असते
  • ज्या क्रियाकलापांसाठी समतोलता आवश्यक असते

फिझिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपीचा घेणे अनेकदा आवश्याक असते. आणि अर्थातच, विश्रांती आवश्यक आहे. जखमेच्या ड्रेसिंगसाठी आणि मेंदूच्या कार्यात्मक मूल्यांकनासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर दीर्घ विश्रांतीची आवश्यकता असते. विश्रांतीच्या काळात रूग्ण काही काम धंधा करू शकत नाही आणि यामुळे भारतात मेंदूच्या शस्त्रक्रियेचा खर्च वाढतो.

क्रॅनिओटॉमी नंतरचे जीवन

रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर, काळजी घेणे अजूनही महत्त्वाचे आहे. असे करणे हे भविष्यातील दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि दीर्घकालीन आयुष्य सुधारण्यासाठी मदत करते. अशा मोठ्या शस्त्रक्रियेतून बरे झाल्यानंतर खालील गोष्टी करणे अत्यंत आवश्यक असते:

  • नियमित व्यायाम
  • सकस आहार
  • अल्कोहोल (दारू) मर्यादित किंवा टाळा
  • धूम्रपान सोडा
  • पुरेशी झोप घ्या

कॉम्प्लिकेशन्स - दुष्परिणाम

सर्व शस्त्रक्रियांप्रमाणे, क्रॅनिओटॉमीमुळे वेदना, रक्तस्त्राव, संसर्ग इत्यादी गुंतागुंत होऊ शकतात. परंतु असे झाल्यास सर्जन त्यांवर उपचार करतात. रुग्णांना गंभीर डोकेदुखी, फेफरे किंवा जखमेच्या संसर्गाची चिन्हे असल्यास त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलशी संपर्क साधावा.

थोडक्यात…

क्रॅनिओटॉमी म्हणजे फक्त कवटी उघडणे. ही कोणती विशिष्ट शस्त्रक्रिया नाही. हे ऑपरेशन भारतातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या शहरांमध्ये केले जाऊ शकते. “आयुष्यमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेद्वारे ” किंवा इतरांना वैद्यकीय विम्याद्वारे भारतात ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेचा खर्च अगदी गरीबांनादेखील परवडणारा आहे.