By Dr.Ravindra Patil
क्रॅनियोटॉमी ही एक सामान्य प्रकारची मस्तिष्क शस्त्रक्रिया आहे. यामध्ये कवटीचा काही भाग उघडला जातो, व त्या भोकाच्या मार्गे डॉक्टरांना मेंदूची आवरणे व मेंदू पहाता येते प त्यावर उपचारासाठी शस्त्रक्रिया करता येतात. तसेच थेट मस्तिष्काचा अभ्यास करता येतो. क्रॅनियोटॉमी शस्त्रक्रिया बहुधा ट्यूमर काढण्यासाठी, रक्तस्त्राव (ब्रेन हेमरेज) थांबवण्यासाठी, किंवा मेंदूच्या इतर रोगांचे निदान व उपचार करण्यासाठी केली जाते.
एंडोस्कोपी म्हणजे छोट्या नळी द्वारे कोणत्याही अवयवाच्या आत बघणे. न्यूरोएंडोस्कोपीमध्ये एक लहान, लवचिक नळीसारखा उपकरण वापरले जाते. त्याला एन्डोस्कोप म्हणतात. हे उपकरण मस्तिष्क किंवा मेरुदंडाच्या विविध भागांमध्ये घालतात व त्यातून सर्जरी साठी मेंदूच्या आत किंवा मेंदूच्या अगदी जवळ प्रवेश करण्यात येतो. एन्डोस्कोपच्या मदतीने डॉक्टरांना आतले दृश्य स्पष्टपणे दिसते आणि किरकोळ किंवा बारीक शस्त्रक्रिया करता येते. याचा वापर विशेषतः हायड्रोसेफॅलस आणि कॅवर्नोमा यांसारख्या रोगांसाठी केला जातो.
स्पायनल फ्युजन ही शस्त्रक्रिया मेरुदंडाच्या समस्या, जसे की डिस्क डीजेनेरेशन, स्कोलियोसिस, किंवा फ्रॅक्चर यांसाठी केली जाते. यामध्ये दोन किंवा अधिक कशेरुकांना (vertebrae) एकत्रित करून स्थिर केले जाते, ज्यामुळे वेदना कमी होते आणि मेरुदंडाची स्थिरता वाढते. पण दोन मणके अशा प्रकारे एकमेकांना कायमचे जोडले की पाठीची हालचालही कमी होते हे लक्षात घ्यायला पाहिजे.
मायक्रोडिस्केक्टॉमी ही शस्त्रक्रिया मेरुदंडाच्या डिस्क समस्यांसाठी वापरली जाते. डिस्क म्हणजे इन्टर व्हरटिब्रल डिस्क, जी दोन मणक्यांच्या मध्ये असलेली चकती असते. हर्निएटेड डिस्क म्हणजे डिस्कच्या पोटातील द्रव बाहेर येतो व जवळच्या तंत्रिकांवर दाब येतो व रूग्णाला पाठीत व पायात सतत दुःखत राहते. अशा हर्निएटेड डिस्कच्या उपचारासाठी मायक्रोडिस्केक्टॉमी शस्त्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत लहान चिरा करून डिस्कचा फक्त नेमका प्रभावित भाग काढला जातो, ज्यामुळे तंत्रिका तंतूवरील दाब कमी होतो व रूग्णाचे दुःखणे कमी होते.
जेव्हा एखाद्या धमनीचा भाग फुगून बसतो तेव्हा त्याला अॅन्युरिझम म्हणतात. अॅन्युरिझम फुटण्याची भिती असते. तसे झाले तर रक्तास्राव होऊन जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. अॅन्युरिझमचा उपचार त्या कॉईल घालून अथवा त्याला क्लिप लावून करतात. अॅन्युरिझम क्लिपिंग ही शस्त्रक्रिया रक्तवाहिन्यांच्या फुगवलेल्या भागांवर केली जाते. यामध्ये फुगवलेल्या भागावर धातूची क्लिप लावून रक्तप्रवाह थांबवला जातो, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता कमी होते.
ट्रॅक्टोग्राफी ही आधुनिक न्यूरोसर्जरीची एक पद्धत आहे ज्यामध्ये मस्तिष्काच्या तंतूंचा अभ्यास केला जातो. हे MRI स्कॅनिंगच्या मदतीने केले जाते आणि यामध्ये मस्तिष्काच्या विविध भागांमधील तंतूंचे मार्ग पहाण्यात येतात. या तंत्रज्ञानाचा वापर मस्तिष्काच्या विविध भागांच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्यांच्या सुरक्षिततेसाठी केला जातो.
डिप ब्रेन स्टिम्युलेशन (DBS) ही एक न्यूरोसर्जरी आहे जी पार्किन्सन्स रोग, एपीलेप्सी आणि ओ.सी.डी. सारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. या प्रक्रियेत मस्तिष्काच्या विशिष्ट भागात इलेक्ट्रोड्स बसवले जातात आणि त्यांना एक बाह्य उपकरण जोडले जाते जे विद्युत प्रवाह देऊन मस्तिष्काच्या क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवते.
लॅमिनेक्टॉमी ही शस्त्रक्रिया मेरुदंडाच्या ताणामुळे होणारी वेदना कमी करण्यासाठी केली जाते. यामध्ये कशेरुकांच्या मागील भागातील हाड काढून तंत्रिका तंतूंवरील दाब कमी केला जातो. हे विशेषतः स्पायनल स्टेनोसिस आणि हर्निएटेड डिस्कच्या उपचारासाठी वापरले जाते.
Samarth Neuro and Superspeciality Hospital has 100+ beds & specializes in emergency surgery for neurological issues/disorders & diagnostics.
Samarth Neuro and Superspeciality Hospital