स्पाइनल ट्यूमर

पाठीच्या कण्याचे ट्यूमर (स्पाइनल ट्यूमर) म्हणजे काय ?

पाठीचा कणा (स्पाइनल कॉर्ड), पाठीच्या मणक्यांच्या आत किंवा सभोवतालच्या भागात गाठ होणे व त्याची अनियंत्रित, असामान्य वाढ होणे म्हणजे स्पाइनल ट्यूमर. ट्यूमर होतो कारण सामान्य रीते पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कार्य करू शकत नाही आणि म्हणून पेशी अनियंत्रितपणे वाढतात.

स्पाइनल ट्यूमर साधा (कर्करोग रहित म्हणजेच बिनाईन) किंवा घातक (कर्करोगग्रस्त म्हणजेच मॅलिग्नंट) असू शकतो. प्राथमिक ट्यूमर पाठीच्या मणक्यात किंवा मणक्याच्या भोवताली उद्भवतात आणि मेटास्टॅटिक किंवा दुय्यम ट्यूमर दुसर्‍या ठिकाणाहून पाठीच्या कण्यात येतात व पसरतात.

ब्रेन आणि स्पाइनल ट्यूमरचे दोन मुख्य प्रकार आहेत: ब्रेन किंवा पाठीच्या कण्यामध्ये सुरू होणाऱ्या ट्यूमरला प्राथमिक ब्रेन (किंवा स्पाइनल) ट्यूमर म्हणतात. शरीराच्या दुसर्‍या भागात सुरू होणाऱ्या आणि नंतर ब्रेन किंवा पाठीच्या कण्यामध्ये पसरणाऱ्या ट्यूमरला मेटास्टॅटिक किंवा दुय्यम ब्रेन (किंवा स्पाइनल) ट्यूमर म्हणतात. 

 

स्पाइनल ट्यूमरचे वर्णन दोन प्रकारचे करतात –

  1. मणक्याच्या स्थळ किंवी जागेनुसार स्पाइनल ट्यूमरचे वर्गीकरण मानेच्या मागच्या भागातील स्पाइनल ट्यूमर म्हणजे सरव्हायकल स्पाइनल ट्यूमर, छातीच्या मागच्या भागातील स्पाइनल ट्यूमर म्हणजे थोरॅसीक स्पाइनल ट्यूमर, पाठीच्या मागच्या भागातील स्पाइनल ट्यूमर म्हणजे लंबर स्पाइनल ट्यूमर आणि कंबरेच्या मागच्या भागातील स्पाइनल ट्यूमर म्हणजे सॅक्रल स्पाइनल ट्यूमर.
  2. पाठीच्या कण्यातील त्यांच्या स्थानानुसार, म्हणजे ड्युरामॅटर (ड्युरामॅटर हे स्पाइनच्या भोवतालच्या तीन आवरणांपैकी सर्वात जाड व चिवट आवरण) च्या बाहेर (एक्स्ट्रा ड्यूरल), स्पाइच्या आत (इन्ट्रा ड्यूरल) वगैरे.

Table of Contents

सौम्य (बिनाईन) ट्यूमर...

या ट्यूमर मध्ये कर्करोग (कॅन्सर) नसतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये ते पसरत नाहीत. सौम्य ट्यूमरची उदाहरणे म्हणजे – न्यूरोफायब्रोमा, श्वान्नोमा, मेनिंजियोमा, एपेन्डायमोमा, एस्ट्रोसायटोमा, हिमॅन्जियोब्लास्टोमा, ऑस्टिओसार्कोमा आणि ऑस्टिओइड ऑस्टिओमा.
सौम्य ट्यूमर हातावर किंवा पायावर होतात तेव्हा काही विशेष काळजीचे कारण नसते. पण जेव्हा सौम्य ट्यूमर पाठीच्या कण्यात (स्पाइनल कॉर्ड मध्ये) किंवा मणक्यात किंवा त्याच्या आवरणात होतात, तेव्हा ते अतिशय धोकादायक असतात कारण ट्यूमरमुळे स्पाइनल कॉर्डवर दाब आला तर त्यामुळे तीव्र वेदना आणि ट्यूमरच्या जागेवर अवलंबून शरीरात संवेदना किंवा मोटर कार्यक्षमता (हलन चलन करण्याची क्षमता) वगैरे कमी होऊ शकते किंवा नष्ट होऊ शकते. पण बिनाईन ट्यूमरच्या बाबतीत चांगली गोष्ट ही आहे की एकदा का त्याला शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले की मग रुग्ण बहुतांश प्रसंगी पूर्ण बरे होऊ शकतात.

घातक (मॅलिग्नंट) ट्यूमर

म्हणजे त्या ट्यूमरमध्ये कर्करोग (कॅन्सर) आहे. हे ट्यूमर जवळच्या ऊतींचा नाश करतात आणि शरीराच्या इतर भागां मध्ये पसरुं शकतात. मॅलिग्नंट स्पाइनल ट्यूमरमध्ये कॉर्डोमा, इव्हिंग सार्कोमा आणि वर बिनाईन ट्यूमरच्या परिच्छेदात नमूद केलेल्या प्रकारांचे ट्यूमर देखील समाविष्ट असतात.
घातक ट्यूमर (मॅलिग्नंट ट्यूमर) अधिक धोकादायक असतात कारण त्यांच्यामुळे सौम्य ट्यूमर सारखी दाबामुळे उद्भवणारी सर्व लक्षणे उद्भवतातच आणि त्या शिवाय त्यांची वाढ झपाट्याने होते आणि त्यांचा आकार सतत वाढतो. त्यामुळे आजुवाजुच्या अवयवांवर दाब वाढत जातो आणि त्यामुळे रुग्णांची तब्बेत खूप बिघडते. शिवाय घातक ट्यूमर फुफ्फुसे, किडनी वगैरें सारख्या शरीराच्या इतर अवयवांच्यात देखील पसरू शकतात. घातक ट्यूमरमुळे संपूर्ण शरीरावर विपरीत असर होतो आणि रूग्णाची अवस्था खालावत जाते.
अनेक वेळा घातक ट्यूमर स्थानिक ट्यूमर नसतात परंतु शरीराच्या दूरच्या भागातून स्पाइनल कॉर्ड मध्ये आलेले असतात.
बहुतेक सौम्य ट्यूमर फ्कत शस्त्रक्रियेने बरे होतात पण घातक ट्यूमर बरे करायला शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि/किंवा केमोथेरपी (कर्करोगावर औषध उपचार) वगैरे ची जरूर पडू शकते.
कधीकधी सौम्य ट्यूमरचे रूपांतर घातक ट्यूमरमध्ये होते आणि अशा रुग्णांसाठी उपचार धोरण बदलते आणि त्यांचा उपचार घातक ट्यूमर सारखा करावा लागतो.

स्पाइनल ट्यूमरचे प्रमाण

मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या (ज्याला सेन्ट्रल नर्व्हस सिस्टम अथवा सी.एन.एस. म्हणतात) सर्व ट्यूमरपैकी 85-90% ट्युमर इंट्राक्रॅनियल (मेंदूच्या आतले) ट्यूमर असतात. मेंदूत उद्भवणाऱ्या सी.एन.एस. ट्यूमरच्या तुलनेत पाठीचा कणा, पाठीच्या मणक्याची मज्जातंतूंची मुळे आणि ड्युरामॅटर (मेंदूच्या तीन आवरणांपैकी एक जाड अवरण) यांत उद्भवणारे प्राथमिक ट्यूमर दुर्मिळ असतात. प्रत्येक चार इंट्राक्रॅनियल (मेदूच्या आतील) ट्यूमर च्या प्रमाणात पाठीच्या मणक्याचा एकच ट्यूमरवर उद्भवतो असे म्हणता येईल.
न्यूरल / ड्युरा मॅटरचे ट्यूमर आणि आजूबाजूच्या मणक्याच्या हाडांचे ट्यूमर यांचे प्रमाण थोडेबाहुत वेगळे असते.
मेरुदंडाच्या (स्पाइनल कॉर्डच्या) मेटास्टॅटिक ट्यूमरच्या तुलनेत इंट्रामेड्युलरी (पाठीचा कण्याच्या आतील) ट्यूमर प्रणाणात कमी असतात. म्हणजेच मेरुदंडात मेटास्टॅटीक ट्यूमरचे प्रमाण जास्त असते.
‘वर्टीब्रल हेमॅन्गियोमा’ हा ट्यूमर प्राथमिक स्पाइनल ट्यूमर आहे. तो मेरुदंडात उद्भवतो व हळुहळु वाढत जातो.
स्पाइनल एपिड्यूरल मेटास्टॅटिक ट्यूमर स्पाइनल ट्यूमर मधील सर्वात जास्त वेळा होणारा ट्यूमर प्रकार आहे. हे ट्यूमर शरीरातील इतर ठिकाणी झालेल्या कर्करोगापासून मणक्यात स्थलांतरित होतात. ते कर्करोगाच्या 10% रुग्णांमध्ये आढळतात. मेटास्टॅटिक स्पाइनल ट्यूमर सामान्यत: हाडांच्या मणक्यात उद्भवतात आणि नंतर वाढतात, ज्यामुळे पाठीचा कणा आणि मज्जातंतूंच्या मुळांचे संपीडन (कॉम्प्रेशन) होते. त्याच्या उपचारासाठी ‘डीकंप्रेशन’ म्हणजे संपीडन कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

स्पाइनल ट्यूमरचे प्रकार

स्पाइनल कॉर्ड (मेरुदंड) च्या ट्यूमर खालील प्रकारचे असतात.
  1. अॅस्ट्रोसाइटोमा
  2. कॉर्डोमा
  3. एपेन्डीमोमा
  4. ग्लिओमा
  5. मेनिन्जिओमा
  6. न्यूरोफायब्रोमा
  7. श्वान्नोमा

पाठीचा ट्यूमरचे वर्गीकरण

स्पाइनल कॉर्ड ट्यूमर तीन वेगवेगळ्या प्रकारांपैकी एक म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकतात. हे वर्गीकरण त्यांच्या व मेंदूच्या आवरणांच्या एकमेकांच्या स्थिती वर आवलंबून असते.
  1. इंट्रामेड्युलरी ट्यूमर – पाठीच्या कण्यातील पेशींमध्येच म्हणजे स्पाइनल कॉर्डच्या आत सुरू होतात, उदाहरणार्थ ग्लिओमा, एस्ट्रोसाइटोमा किंवा एपेन्डीमोमा.
  2. एक्स्ट्रामेड्युलरी ट्यूमर – एकतर स्पाइनल कॉर्ड भोवतीच्या आवरणावर उगवतात किंवा स्पाईलन कॉर्ड मधून निघणार्या मज्जातंतूच्या मुळांमधून वाढतात. हे ट्यूमर जरी स्पाइनल कॉर्ड मधून सुरू होत नसले तरी हे ट्यूमर पाठीच्या कण्याला संपीडन करवतात आणि त्यामुळे इतर समस्या निर्माण होऊन स्पाइनल कॉर्डच्या कार्यावर परिणाम करू शकतात. असल्या एक्स्ट्रामेड्युलरी ट्यूमरची उदाहरणे म्हणजे मेनिन्जियोमा, न्यूरोफायब्रोमा, श्वाननोमा आणि नर्व शीथ ट्यूमर.
  3. शरीराच्या इतर भागांतील घातक (मॅलीग्नंट) ट्यूमर मेरुदंड, मेरुदंडाभोवती आधार देणारे मज्जातंतूंचे जाळे किंवा क्वचित प्रसंगी स्पाइनल कॉर्ड मध्ये पसरू शकतात. यांना आधी सांगितल्या प्रमाणे मेटास्टॅटीक ट्यूमर म्हणतात.
स्पाइनल ट्यूमर किंवा कोणत्याही प्रकारच्या वाढीमुळे रूग्णाला वेदना, न्यूरोलॉजिकल समस्या (शरीरात बधीर पणा, हातापायात सुन्नपणा, मुंग्या येणे तसेच स्नायुंमध्ये अशक्तपणा येणे आणि कधीकधी अर्धांगवायु होणे) वगैरे लक्षणे येऊ शकतात. स्पाइनल ट्यूमर जीवघेणा असू शकतो आणि कायमचे अपंगत्व पण आणू शकतो.

स्पाइनल ट्यूमरची लक्षणे

पाठीच्या कण्यातील गाठींमुळे वेगवेगळी चिन्हे आणि कॅन्सरची लक्षणे येऊं शकतात. विशेषत: गाठी वाढत असताना लक्षणे पण वाढत जातात. ट्यूमरचा दुष्परिणाम स्पाइनल कॉर्ड वर, रक्तवाहिन्यांवर किंवा पाठीच्या हाडांवर होऊ शकतो. त्यामुळे रूग्णाला खालील चिन्हे आणि लक्षणे असू शकतात –

  1. ट्यूमरच्या वाढीमुळे गाठीच्या ठिकाणी वेदना
  2. पाठदुखी, की जी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते
  3. वेदना, उष्णता आणि थंडपणाची संवेदनशीलता कमी होणे
  4. मूत्राशय व आंत्र नियंत्रण अकार्यक्षम 
  5. चालण्यात अडचण, कधीकधी पडणे
  6. रात्री जास्त वाढणारी पाठदुखी
  7. संवेदना कमी होणे किंवा स्नायू कमकुवत होणे, विशेषत: हातांत किंवा पायांच्या स्नायूत अशक्त पणा वाटणे
  8. शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या स्नायूंमध्ये सौम्य किंवा गंभीर कमकुवतपणा
  9. पाठ दुखी हे स्पाइन ट्यूमरच्या गाठीचे सर्वसामान्य व पहिले लक्षण आहे. ट्यूमर मुळे होणार्‍या वेदना पाठीच्या खाली नितंब, पाय, पाय किंवा खांदे मान, हातांवर पसरू शकतात, आणि कालांतराने हळुहळु उपचार करून देखील रूग्णाची परिस्थिती आणखी बिघडू शकते.

स्पाइनल ट्यूमरची वाढ

ट्यूमरच्या प्रकारानुसार स्पाइनल ट्यूमर वेगवेगळ्या गतीने वाढतात.

पाठदुखीची अनेक कारणे आहेत आणि बहुतेक वेळी पाठदुखी गाठीमुळे होत नाही. परंतु पाठदुखी अनेक दिवस सतत राहिली आणि कमी झालीच नाही तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे कारण ती पाठदुखी स्पाइनल ट्यूमर मुळे असुं शकते. विशेष करून खालील लक्षणांपैकी काही लक्षणे असल्यास पाठदुखी साठी लवकरात लवकर डॉक्टरना दाखवणे:

  1. काहीही काम न करता पण पाठ दुखणे
  2. ट्यूमरच्या जागे पासून हाता पायां पर्यंत पसरणारी पाठदुखी
  3. रात्रीच्या वेळी पाठदुखी वाढणे
  4. रूग्णाला आधी कर्करोग होता आणि नवीन पाठदुखी होणे
  5. रूग्णाला कर्करोगाची इतर लक्षणे पण आहेत, उदाहरणार्थ मळमळ, उलट्या होणे, अशक्तपणा वाटणे किंवा चक्कर येणे
  6. सीटी स्कॅन अथवा एमआरआय स्कॅन मध्ये दिसलेल्या ट्यूमरच्या जागी औषधांनी बरी न होणारी सतत पाठदुखी

तात्कालिक डॉक्टरांना कधी भेटावे

तुम्हाला खालील पैकी कोणताही अनुभव आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा:
  1. पायात किंवा हातांमध्ये सतत वाढत जाणारा स्नायूंचा अशक्तपणा किंवा सुन्नपणा
  2. आंत्र किंवा मूत्राशयाचे नियंत्रण गमावणे

स्पाइनल ट्यूमर होण्याची कारणे

बहूतेक स्पाइनल ट्यूमर का होतात याची कारणे अनेक शास्त्रीय संशोधनांनतर देखील स्पष्ट झाली नाहीत. वैद्यकीय तज्ञांचा असा विश्वास आहे की अनुवांशिक रचना स्पाइनल ट्यूमरच्या निर्मितीमध्ये काही अंशी भूमिका बजावते.

परंतु हे अद्याप स्पष्ट झाले नाही की असे अनुवांशिक दोष वारसाने मिळतात की कालांतराने विकसित होतात. ते वातावरणातील एखाद्या गोष्टीमुळे देखील होऊ शकतात, जसे की विशिष्ट रसायनांचा संपर्क.

काही रूग्णांमध्ये स्पाइनल कॉर्ड ट्यूमर ज्ञात वंशपरंपरागत सिंड्रोमशी जोडलेले असतात, जसे की न्यूरोफिब्रोमाटोसिस 2 आणि वॉन हिप्पल-लिंडाऊ रोग.

स्पाइनल ट्यूमर उत्पन्न करू शकणारे घटक

पाठीच्या कण्यातील गाठी खालील प्रकारच्या लोकांमध्ये इतरांपेक्षा अधिक वेळा असतात:
    1. न्युरोफिब्रोमाटोसिस 2 विकार – या आनुवंशिक विकारात श्रवणशक्तिशी संबंधित नसांवर किंवा त्याच्या जवळ सौम्य ट्यूमर विकसित होतात. यामुळे एक किंवा दोन्ही कानांमध्ये हळुहळु श्रवणशक्ती कमी होऊ शकते. न्यूरोफिब्रोमाटोसिस 2 असलेल्या काही रूग्णांमध्ये स्पाइनल कॅनॉल ट्यूमर देखील होतात.
    2. वॉन हिपल-लिंडाऊ रोग – हा दुर्मिळ, अनेक अवयवांवर दुष्परिणाम करणारा रोग, मेंदू, रेटिना आणि पाठीच्या कण्यातील रक्तवाहिन्या ट्यूमर (हेमांजीओब्लास्टोमा) आणि मूत्रपिंड किंवा अधिवृक्क ग्रंथींमधील इतर प्रकारच्या ट्यूमरशी संबंधित आहे.

स्पाइनल ट्यूमरची कॉम्प्लिकेशन्स

स्पाइनल ट्यूमर पाठीच्या मज्जातंतूंवर दबाव आणू शकतात, ज्यामुळे ट्यूमरच्या स्थानाच्या खाली हालचाल किंवा संवेदना कमी होते. यामुळे कधीकधी आतडी आणि मूत्राशयाच्या कार्यामध्ये विपरीत बदल होऊ शकतो. कधी कधी मज्जातंतूंचे कायमचे नुकसान होऊ शकते.

पण जर स्पाइनल ट्यूमरचे लवकर निदान झाले आणि त्यावर योग्य उपचार केले गेले तर, पुढील नुकसान टळते आणि मज्जातंतू पुन्हा कार्यरत होणे शक्य असते.

स्पाइन ट्यूमरची लक्षणे जीवघेणी आहेत की नाही हे अवलंबून असते स्पाइनल कॉर्डच्या कुठल्या भागत ट्यूमर आहे ह्या वर. म्हणजेच काही ठिकाणी ट्यूमर असल्यास जीवाला धोका असतो तर इतर ठिकाणी नसतो.

स्पाइनल ट्यूमरचे निदान

पाठदुखी आणि न्यूरोलॉजिकल कमतरता (म्हणजे कमी झालेली कार्यशीलता) याचा पूर्ण शोध घेणार्‍या वैद्यकीय तपासण्या ही स्पाइनल ट्यूमरचे अचूक निदान करण्याची पहिली पायरी आहे. अचूक आणि खात्रीदायक निदाना साठी रेडिओलॉजिकल चाचण्या आवश्यक असतात. एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एम.आर.आय. स्कॅन या रेडिओलॉजिकल चाचण्या आहेत. सर्वप्रथम एक्स-रे छायाचित्र काढतात. मग सीटी स्कॅन आणि एमआरआय स्कॅन करतात. हे स्कॅन ट्यूमरचे स्थान, आकार व माप तीन आयामांमध्ये (थ्री डायमेन्शन मध्ये) अचूकपणे दाखवतात.

कधीकधी स्पाइनल ट्यूमरचा आकार आणि स्थान तंतोतंत पणे चिन्हांकित करण्यासाठी मायलोग्राम केला जातो.

मायलोग्राम ही एक निदान प्रणाली आहे. त्यात स्पाइनल कॅनल मध्ये सुई व सिरिंजने रेडियो ओपेक डाय (म्हणजे एक्स-रे छायाचित्रात पांढरा रंग दिसेल असे औषध) घालून छायाचित्रे काढतात. इंजेक्शनच्या सुई व सिरिंज द्वारे पाठीच्या दोन मणक्यांमधून स्पायनल कॅनॉल मध्ये डाय इंजेक्ट केला जातो. त्यानंतर एक्स-रे छायाचित्रा काढली जातात. मायलोग्राम स्पाइलन कॉर्ड व त्यातून निघणार्या मज्जातंतूंच्या आकार दाखवतो व त्यावरून खूप महत्त्वाची माहिती मिळते.

टेक्नटियम – 99 डाय हा रेडियो एक्टिव डाय आहे. हा डाय वापरून हाडांचे स्कॅन केले जातात. ह्या स्कॅनने हे कळते की मणक्याचा ट्यूमर आहे की मणक्यात संसर्ग जन्य रोग (इन्फेक्शन) आहे. या स्कॅनने मणक्यांच्या हाडाच्या कार्यशीलते विषयी पण माहिती मिळते.

बायोप्सी

बायोप्सी म्हणजे शरीराचा थोडासा भाग काढून त्याची पॅथ़लोजी लॅबरॉटरीत तपासणी करणे.
वर नमूद केलेले रेडिओलॉजी अभ्यास बहुधा ट्यूमरचे प्रकार सुचवतात. काही रूग्णांमध्ये निदान अस्पष्ट असल्यास किंवा डॉक्टरांना घातक (मॅलिग्नंट) ट्यूमरचा संशय असल्यास बायोप्सीची आवश्यकता उत्पन्न होते. जर ट्यूमर घातक असेल तर बायोप्सी कर्करोगाचा प्रकार निश्चित करण्यात मदत करते. कर्करोगाचे अचूक निदानच योग्य उपचार करण्यास सर्वात उपयोगी असते.

स्पाइन ट्यूमरचे स्टेजिंग

स्टेजिंग म्हणजे ट्यूमरची गंभीरता दर्शवणारे टप्पे. ट्यूमरच्या व्याप्तीनुसार घातक ट्यूमरांचे वर्गीकरण म्हणजे स्टेजिंग करण्यात येते. स्टेजिंग करून ट्यूमरच्या नेमक्या हिश्याचे (म्हणजे हाड, मऊ भाग, अथवा स्पाइनल कॅनॉल मधील ट्यूमर) मूल्यांकन करण्यात मदत होते. अणू तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टर संपूर्ण शरीराचे स्कॅन, तसेच ट्यूमरचे स्टेजिंग करण्यासाठी फुफ्फुस आणि उदर यांचे सीटी स्कॅन पण करवू शकतात. हे करून निदानाची पुष्टी होण्यास मदत होते. डॉक्टर बायोप्सीच्या सॅम्पलवर पॅथॉलोजी प्रयोगशाळेच्या चाचणीचे परिणाम आणि वर नमूद केलेल्या स्कॅनची रुग्णाच्या लक्षणांशी सह-संबंध बघतात आणि त्यावरून अचूक निदान करू शकतात.

स्पायनल ट्यूमरचे उपचार

स्पाइनल ट्यूमरच्या उपचारात शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी किंवा किमोथेरपीची औषधे वापरण्यात येतात.

शस्त्रक्रिया न करता करण्यात येणारे उपचार म्हणजे –

  1. निरीक्षण (ट्यूमर वाढतोय का कमी होतोय का तेवढाच राहतोय) याची डोळ्यांनी व तशीच विविध स्कॅननी तपासणी
  2. किमोथेरपी
  3. रेडिएशन थेरपी

लक्षणे नसलेले ट्यूमर किंवा सौम्य लक्षणात्मक ट्यूमर व ज्यांचा आकार बदलत नाहीत असे ट्यूमर यांचे नियमित एम.आर.आय. स्कॅन करून नियमित निरीक्षण करण्यात येते व ट्यूमरच्या आकारात काही फेरबदल झाला की लगेच उपचार बदलतात.

काही ट्यूमर किमोथेरपीने उत्तम प्रकारे बरे होतात, तर काही ट्यूमर रेडिएशन थेरपीने बरे होतात.

काही विशिष्ट प्रकारच्या मेटास्टॅटिक ट्यूमररांचा रेडिओथेरपीने उपचार करता येत नाही. उदाहऱणार्थ आतड्यांच्या कॅन्सर व किडनीच्या कॅन्सर मुळे मेरुदंडात पसरलेले मेटास्टीक कॅन्सर. या प्रकारच्या मेटास्टीक कॅन्सरचा उपचार केवळ शस्त्रक्रियेद्वाराच होतो, परंतु रेडियोथेरपीने होत नाही.

स्पाइनल ट्यूमरचा शस्त्रक्रिया द्वारे उपचार

लहान मुले आणि प्रौढ व्यक्ति, या दोघांनाही स्पाइनल ट्यूमर होऊ शकतो. परंतु उपचाराच्या वेळी प्रौढांसारखी लहान मुलांच्या हाडांची पूर्ण वाढ झालेली नसते याचा विचार करून मग च उपचारांची योजना शल्य चिकित्सक बनवतात.

स्पाइनल ट्यूमरसाठी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे इतर घटक म्हणजे स्पाइनची म्हणजे मेरुदंडाची स्थिरता, सर्जिकल आणि नॉन सर्जिकल उपचार आणि न्यूरोलॉजिकल फंक्शनचे संरक्षण (म्हणजे मेंदू व ज्ञानतंतुंची कार्यक्षमता संभाळणे).

“स्पाइनल ट्यूमरवर वेळेवर उपचार करणे हाच त्यातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे” डॉ रवींद्र पाटील म्हणतात

मुळात, बहुतेक पाठीच्या शस्त्रक्रियांचे लक्ष्य ‘डीकंप्रेशन’ असते, म्हणजे ट्यूमरमुळे आलेला दबाव कमी करणे हे असते. ‘कॉम्प्रेशन’ म्हणजे ट्यूमरमुळे स्पाइनल कॉर्ड अथवा मज्जातंतूवर आलेला दबाव किंवा संपीडन. शस्त्रक्रियाचा हेतुं असतो दाब कमी करणे.

संपूर्ण ट्यूमर किंवा त्याचा काही भाग शस्त्रक्रियेने काढला जाऊ शकतो. जर ट्यूमरचा एक छोटासा भाग काढला गेला तर त्याला ‘डिबल्क शस्त्रक्रिया’ (म्हणजे ट्यूमरचा आकार कमी करणे) म्हणतात. ‘एक्सिजन’ म्हणजे ट्यूमर पूर्णपणे काढून टाकणे. ‘रिसेक्शन’ म्हणजे ट्यूमरचा बहुतांश भाग काढणे. या प्रकारच्या प्रक्रिया पाठीचा कणा आणि मज्जातंतूच्या मुळांवर दबाव कमी करतात आणि त्यामुळे वेदना आणि ट्यूमरची इतर लक्षणे कमी होण्यास मदत होते.

शस्त्रक्रिया पुढून करावी का मागून करावी ?

जर शस्त्रक्रिया करणे आवश्याक झाले तर ट्यूमर कापण्यास ट्यूमर नक्की कुठे स्थित आहे हे जाणून ट्यूमर पर्यंत पोहोचण्यासाठी रूग्णाला पालथे झोपवून पाठीवर शस्त्रक्रिया करायची का उताणे झोपवून ट्यूमर काढायचा हे नक्की केले जाते. पालथे झोपवून सर्जरी करतांना ड्यूरामॅटर ओळखण्यास आणि मज्जातंतूच्या मुळांना उघड करण्यास सोपे पडते. देते. पाठीच्या स्तंभाच्या मागील बाजूस असलेल्या ट्यूमरसाठी किंवा ड्यूरामॅटरच्या (स्पायलन कॉर्ड भोवतालचे एक जाड आवरण) आत ट्यूमर उघड करण्यासाठी रूग्णाला पालथे झोपवून शस्त्रक्रिया करतात. आशा प्रकारच्या सर्जरीत अनेक मणक्यातील दबाव एकाच शस्त्रक्रियेत कमी करून डिकंप्रेशन केले जाऊ शकते.

रूग्णाला उताणे झोपवून शस्त्रक्रिया केली जाते पाठीच्या पुढचे ट्यूमर काढण्यासाठी. या प्रकारच्या शस्त्रक्रियेत मणक्याचे अंग (वर्टिब्रल बॉडी) काढता येते व त्यामुळे होणारे त्रास थांबवता येतात व त्यामुळे उत्पन्न झालेल्या दोषांची पुनर्रचना करणे शक्य होते. सर्जरीचा हा रस्ता शॉर्ट-सेगमेंट फिक्सेशन डिव्हाइसेसचे अचूक प्लेसमेंट करणयात खूप मदतरूप होतो.

काही छातीच्या (थोरॅसिक) आणि कंबरेच्या (लंबर अथवा सॅक्रल) भागातील ट्यूमर काढणे फार अवघड असू शकते. म्हणून वरील दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया एका नंतर दुसरी अशा प्रकारे दोन टप्यातही करण्यात येतात. आधी रूग्णाला पालथे झोपवून व नंतर रूग्णाला उताणे झोपवून शस्त्रक्रिया केल्या तर कधी कधी ट्यूमर संपूर्ण पणे काढता येतो.

प्री-ऑपरेटिव्ह एम्बॉलायझेशन

एम्बॉलायझेशन म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध आणणे. हा उपचार जिथे शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढणे शक्य अशा सौम्य ट्यूमरच्या उपचारांमध्ये केला जातो. आधीपासून एम्बॉलायझेशन केलेले असले तर शस्त्रक्रिये दरम्यान रक्तस्राव कमी होतो. सर्व मज्जतंतूंना रक्त प्रवाह खूप मुबलक प्रमाणात असतो म्हणून एम्बॉलायझेशन करून रक्तस्राव कमी करण्याचा हा एक प्रयत्न असतो.

प्री-ऑपरेटिव्ह एम्बोलिझेशनचा म्हणजे शस्त्रक्रिया करण्या आगोदर एम्बोलिझेशन करणे. शस्त्रक्रिया करतांना रक्तस्त्राव कमी झाला तर सर्जनचे काम पण थोडे सोपे होते. ही प्रक्रिया कॅथ लॅब मध्ये होते व या प्रक्रियेत जांघेतील धमनीत बारीक कॅथेटर घालतात व कॅथेटरचे टोक रक्तवाहिन्यांमधून ट्यूमरच्या ठिकाणी ढकलले जाते. तिथे एका डिंका सारखा द्रव पदार्थ – एम्बोलाझिंग एजंट – सोडतात व तो ट्यूमरला पोसणाऱ्या रक्त वाहिन्यांना अवरोधित करतो. जेव्हा ट्यूमरला पोसणाऱ्या रक्तवाहिन्याच बंद केल्या जातात, तेव्हा शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी होतो व त्यामुळे शस्त्रक्रियेची जोखीम व त्यानंतरची कॉम्प्लिकेशन्स कमी होण्यास मदत होते.

स्पाइनल ट्यूमर शस्त्रक्रियेतील धोके

स्पाइनल शस्त्रक्रियेदरम्यान मणक्याचे नुकसान होण्याचा थोडासा धोका असतो. परंतु जर शस्त्रक्रिया केली गेली नाही तर मज्जातंतू किंवा मणक्यांना कायमच्या आपत्तीजनक दुखापतीचा निश्चित धोका असतो.

जर रुग्णाने शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आणि गाठ वाढत राहिली तर त्या रुग्णला ट्यूमरच्या वाढीमुळे पक्ष घात होऊ शकतो. अशा रूग्णांना रक्ताच्या धमनीच्या आत गुठळ्या आणि इतर आरोग्याच्या गंभीर गुंतागुंतीच्या आपत्त्यांचा सामना करावा लागतो.

स्पाइनल ट्यूमरसाठी रेडिएशन थेरपी

रेडिएशन थेरपी मुख्यतः मेटास्टॅटिक स्पाइनल ट्यूमरसाठी (इतर ठिकाणांहून पसरलेल्या ट्यूमरसाठी) वापरली जाते. याचा अर्थ शरीरात इतरत्र कॅन्सच्या गाठी झाल्या आणि त्या पाठीच्या कण्यापर्यंत पसरल्या.

कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी, ट्यूमरचा आकार कमी करण्यासाठी आणि सतत मणक्याचे दुखणे कमी करण्यासाठी व तसेच कर्करोगामुळे उद्भवणारी लक्षणे कमी करण्यासाठी रेडिएशन थेरपी वापरतात. यात किरणोत्सर्गी ऊर्जा वापरतात, उदाहरणार्थ एक्स-रे किरण. रेडिएशन थेरपी स्वतंत्रपणे किंवा शस्त्रक्रियेच्या बरोबर वापरली जाऊ शकते. रेडिएशन कर्करोगाच्या पेशींच्या डी.एन.ए.चे नुकसान करून त्यांना नष्ट करते. मिरजेतील समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्पाइनल ट्यूमरचा शस्त्रक्रिया द्वारे उपचार होऊ शकतो.

स्पाइनल ट्यूमरसाठी किमोथेरपी

किमोथेरपी म्हणजे औषधे वापरून संपूर्ण शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे. किमोथेरपी स्पाइनल कॉर्ड ट्यूमरच्या उपचारासाठी क्वचितच वापरली जाते. पण जर ट्यूमर कर्करोगाचा असेल आणि वेगाने वाढणारा असेल व ज्यामुळे रोग पाठीच्या कण्याबाहेर पसरण्याचा धोका असेल अशा रूग्णांमध्ये किमोथेरपीचा नक्कीच उपयोग करतात. किमोथेरपी अनेकदा शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी नंतर दिली जाते.

बहुतेक किमोथेरपीची औषधे इंट्राव्हेनस (शिरे द्वारे) दिली जातात. किमोथेरपी नेहमी ‘सायकल्स’ मध्ये दिली जाते; एका सायकल मध्ये औषधे दिल्यानंतर थोडा काळ विश्रांती साठी असतो. त्यानंतर पुन्हा औषधे देतात व पुन्हा रूगणाला विश्रांती साठी थोडा काळ औषधे बंद करतात. 

स्पाइनल ट्यूमरसाठी केमोथेरपीबद्दल येथे अधिक वाचा

स्पाइनल ट्यूमर्सच्या उपचारांच्या परिणामाची अपेक्षा

स्पाइनल ट्यूमर्सच्या उपचाराचा परिणाम रुग्णाचे वय आणि एकूण आरोग्यावर आणि स्पाइनल ट्यूमर सौम्य आहे किंवा घातक आहे, प्राथमिक आहे किंवा मेटास्टॅटिक आहे; यावर अवलंबून असते.

प्राथमिक सौम्य आणि घातक ट्यूमरच्या उपचाराच्या बाबतीत ध्येय एकच असते – म्हणजे ट्यूमर पूर्णपणे काढून टाकणे. यामुळे ट्यूमर बरा होतो, घातकपणा असल्यास घातकपणा आणि त्याची लक्षणे नाहीशी होतात आणि रोग्याच्या मज्जातंतूंची कार्यशीलता कमी होत नाही.

काही प्राथमिक ट्यूमरमध्ये – विशेषत: स्पाइनल कॉर्ड-इंट्रामेड्युलरी ट्यूमर मध्ये – मज्जातंतूंना इजा झाल्याशिवाय संपूर्ण पणे ट्यूमर काढणे (रीसेक्शन) शक्य नसते. त्यामुळे शस्त्रक्रिया करणयात येत नाही. आणि जरी ओपरेशन केले तरी त्याचे परिणाम अपेक्षेप्रमाणे चांगले येऊ शकत नाहीत.

मेटास्टॅटिक [शरीराच्या इतर भागातून मणक्यात पसरलेल्या गाठी] ट्यूमरचे उपचार ध्येय जवळजवळ नेहमीच उपशामक असते, म्हणजे रुग्णाचे दुःखणे कमी करणे व शक्यतो आरामदायक व दीर्घ आयुष्य देणे हे असते.

मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये कोणत्याही शस्त्रक्रिये नंतर होणारी क़ॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, उदाहरणार्थ संसर्ग (इन्फेक्शन), रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे (डीप व्हेन थ्रोम्बोसीस) वगैरे धोके असतात.

त्या शिवाय प्रौढांमध्ये विविध स्पाइनल ट्यूमरच्या उपचारांसाठी केल्या जाणार्या मणक्याच्या शस्त्रक्रियां मध्ये इतर क़ॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात.

हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या रुग्णांमध्ये आधीपासून मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्टिरॉइड्सचा वापर झालेला आहे, त्यांना इतर रुग्णां पेक्षा क़ॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता जास्त असते.