न्यूरो-आयसीयूमधील कोमॅटोज रुग्णांची ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशन दरम्यान व ऑपरेशन नंतरची काळजी

न्यूरो-आयसीयूमधील कोमॅटोज रुग्णांची ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशन दरम्यान व ऑपरेशन नंतरची काळजी

By Dr. Ravindra Patil

अनेकवेळा आपल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागते. त्या वेळी आपण खूप घाबरतो, आपल्याला अशी काळजी वाटते की आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट, पालक किंवा मुलाचा मृत्यू होऊ शकतो ! परंतु साधे आयसीयू कसे कार्य करते आणि न्यूरोलॉजी किंवा न्यूरोसर्जिकल आयसीयू कसे कार्य करते हे समजून घेतल्यास आपली अर्धी चिंता दूर होईल. आयसीयू कसे काम करतात आणि न्यूरो-आयसीयूमध्ये न्यूरो सर्जरीनंतर रुग्णांची कशी काळजी घेतली जाते ते समजून घेऊ या. आयसीयू आणि एन आयसीयू बद्दल जाणून घेऊया.

Table of Contents

आयसीयू म्हणजे काय

याला मराठीत अतिदक्षता विभाग म्हणता येईल. आयसीयू हा रूग्णालयाचा असा विशेष विभाग असतो जिथे गंभीरपणे आजारी रूग्णांचा किंवा जीवघेणी परिस्थिती असलेल्या रूग्णांचा उपचार होतो. आयसीयूत प्रत्येक पलंगा जवळ आयसीयू उपकरणे चालवण्यासाठी जवळपास इलेक्ट्रिक सॉकेट असतात. ऑक्सिजन, वैद्यकीय हवा आणि व्हॅक्यूम आउटलेटसाठी पाईप्ड गॅस आउटलेट जवळपास असतात. आयसीयूमध्ये बाहेरील धुळीचा प्रवेश टाळण्यासाठी कर्मचारी बाहेरचे कपडे काढून अंगात स्क्रब सूट घालतात. आयसीयूमध्ये प्रवेश करताना बूट काढून तिथल्या चपला घालाव्या लागतात. शिवाय हॉस्पिटलचे कर्मचारी कॅप्स आणि मास्क परिधान करतात. रूग्णाला भेटायला येणार्यांना पण कॅप मास्क घालावे लागतात, व तसेच त्यांच्या कपड्यांवर गाउन घालावे लागतात. आयसीयूचे काम २४ तास सात ही दिवस चालूच राहते.

आयसीयू कर्मचारी

आयसीयू कर्मचार्यांच्या टीममध्ये विविध आरोग्यसेवा व्यावसायिकांचा समावेश असतो. उदाहरणार्थ इंटेंसिव्हिस्ट (फिजिशियन किंवा अ‍ॅनेस्थेटीस्ट आणि क्रिटिकल केअस विशेषज्ञ), क्रिटिकल केअर नर्स, रेस्पिरेटरी थेरपिस्ट, फार्मासिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, फिजिकल थेरपिस्ट आणि पेशंट केअर अधिकारी. योग्य उपचार सुनिश्चित करण्यासाठी आणि रुग्णाच्या परिणामांना अनुकूल करण्यासाठी टीम सदस्यांमध्ये खूप सहकार्य असावे लागते.

आयसीयूची उपकरणे

आयसीयू मध्ये ही उपकरणे वापरली जातात: व्हेंटिलेटर, मॉनिटर्स, सिंरिज पंप, इन्फ्युजन पंप, बेडसाइड अल्ट्रासाऊंड मशीन, ट्रान्स-क्रॅनियल डॉपलर, मेडिकल गॅस आउटलेट्स, लॅरींगोस्कोप, पाच ते सात प्रकारे हलु शकणारी इलेक्ट्रिकली ऑपरेटेड बेड आणि सेंट्रल एअर कंडिशनिंग. पेशंटला स्ट्रेचरवरून बेडवर सरकवण्यासाठी पेशंट ट्रान्सफर सिस्टीमचा वापर रुग्णाला होणारा त्रास टाळण्यासाठी आणि आयसीयू कर्मचाऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी केला जातो. डिफिब्रिलेटर, डीप वेन थ्रोम्बोसिस प्रतिबंधक पंप, एअर बेड, वजनाचा तराजू गादीत असलेले इनपेशंट बेड, ग्लुकोमीटर, बीपी उपकरणे आणि नेब्युलायझर या इतर आवश्यक आयसीयूच्या बायोमेडिकल वस्तू आहेत.

आयसीयू मध्ये उपचारांची उद्दिष्टे आणि प्रकार

कुठल्याही आयसीयूचे प्राथमिक उद्दिष्ट हे असते की ज्या रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, ज्यांना गंभीर आजार आहेत किंवा ज्यांना दुखापतीं झाल्या आहेत व महत्वाच्या अवयवाच्या रोगांसाठी आधाराची आवश्यकता आहे अशा रोग्यांना बरे होई पर्यंत मदत करणे. त्याच बरोबर वरील उपचार करतांना शरीरावर पुढील बिघाड टाळणे हे देखील आयसीयूचे एक महत्त्वाचे उद्दीष्ट असते.

आयसीयूचे अनेक प्रकार असतात. उपचार प्रकारावर आधारित मेडिकल आयसीयू, म्हणजे एमआयसीयू, सर्जिकल आयसीयू म्हणजे एसआयसीयू, कार्डियाक आयसीयू म्हणजे सीआयसीयू आणि न्यूरोलॉजिकल आयसीयू म्हणजे एनआयसीयू असे वेगवेगळे आयसीयू असतात.

न्यूरो-आयसीयू किंवा एनआयसीयू

एनआयसीयूमध्ये साध्या आयसीयू मधील उपकरणांशिवाय इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी), इंट्राक्रॅनियल प्रेशर (आयसीपी) मॉनिटरिंग आणि ट्रान्स-क्रॅनियल डॉप्लर अल्ट्रासाऊंड सारखी प्रगत उपकरणे असु शकतात. सीटी-स्कॅन आणि एमआरआय सुविधा एनआयसीयूच्या जवळपास असणे आवश्यक आहे.

एनआयसीयू रुग्णांवर क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया, डोके दुखापत सर्जरी, ट्यूमर शस्त्रक्रिया वगैरे झालेली असु शकते. तसेच स्ट्रोक (पक्षघात) किंवा सेरेब्रल हॅमरेजच्या रुग्णांना देखील एनआयसीयूमध्ये दाखल करून उपचार केले जाऊ शकतात.

कोमॅटोज रुग्ण म्हणजे काय?

कोमॅटोज पेशंट म्हणजे असा रूग्ण की जो प्रकाश, आवाज किंवा स्पर्श यासारख्या बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देत नाही, हेतूपूर्ण हालचाली करत नाही, त्याच्यात जागरुकतेची चिन्हे नसतात व रुग्णाला जागृत करता येत नाही.

रूग्ण कोम्यात जाण्याची अनेक कारणे आहेत, जसे की, डोक्याला दुखापत, पक्षाघात, मेंदूत रक्तस्त्राव, काही अंमली पदार्थांचा दुष्परिणाम, नशा किंवा दीर्घकाळापर्यंत ऑक्सिजनची कमी (हायपोक्सिया).

अशा कोमॅटोज रुग्णांवर शस्त्रक्रियेपूर्वी, शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतर उपचार करणे हा या ब्लॉगचा विषय आहे. वरील तीन गोष्टींना पेरिऑपरेटिव्ह मॅनेजमेंट म्हणून ओळखले जाते.

पेरीऑपरेटीव्ह व्यवस्थापन म्हणजे काय?

ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर रुग्णांची सर्वसमावेशक काळजी आहे. चला त्याचे तीन भाग करूया:

शस्त्रक्रियापूर्व:

रुग्ण शस्त्रक्रियेसाठी ‘फिट’ आहे की नाही हे प्रथम तपासले जाते. याचा अर्थ रक्त चाचण्या, क्ष-किरण, सीटी, एमआरआय, हृदयाची इको तपासणी, भूल देणे, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि विद्यमान संसर्ग आहे का नाही ते तपासणे अशी एक लांबलचक यादी असते. ते सर्व रीपोर्ट चांगले असले तर मग एक फिझिशियन रूग्णाला फिटनेस देतो.

बऱ्याच वेळा मेंदूच्या शस्त्रक्रियेत, रुग्ण शस्त्रक्रियेसाठी ‘फिट’ नसतो, तरीही शस्त्रक्रिया केली जाते कारण रुग्णाला ‘शस्त्रक्रियेसाठी अयोग्य’ बनवणारी परिस्थिती शस्त्रक्रियेनेच बरी होणार असते. कोमॅटोज होणे ही अशीच एक स्थिती आहे जिथे डॉक्टर म्हणू शकतात की रुग्ण ‘शस्त्रक्रियेसाठी फीट नाही’. परंतु न्यूरोसर्जन त्या स्थितीवर शस्त्रक्रियेने उपचार करेल. रुग्णाला तोंडी किंवा ट्यूबद्वारे अन्न दिले जात नाही. याला NBM किंवा Nil By Mouth म्हणतात. शेवटी, रुग्णाची ॲनेस्थेटिस्टद्वारे तपासणी केली जाते. आदर्शपणे शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी आणि ॲनेस्थेशिया देण्याच्या पाच मिनिटे आधी ॲनेस्थेटिस्ट तपासणी करतात. रुग्णाने वरील सर्व चाचण्या आणि निकष पूर्ण केले तरच शस्त्रक्रिया केली जाते.

इंट्राऑपरेटिव्ह:

म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान. यावेळी रूग्णाच्या शरीरात अनेक लाईन्स (म्हणजे नळ्या) असतात. त्या असतात औषधे वितरीत करण्यासाठी, लघवी काढण्यासाठी, दाब मोजण्यासाठी किंवा रक्ताचे नमुने घेण्यासाठी इंट्राव्हेनस लाईन, सेंट्रल वेनस लाईन, फॉलीज कॅथेटर, ICP मॉनिटरींग लाइन, आर्टेरियल लाइन इत्यादी विविध लाईन्स [खरेतर त्या नळ्या असतात] ऍनेस्थेसिया टीमद्वारे घातल्या जातात. मग भूलतज्ज्ञ रुग्णाला ‘इन्ड्युस’ करतो, म्हणजे रुग्णाला बेशुद्ध आणि वेदनामुक्त करतो. बीपी, पल्स, प्रति मिनिट श्वासोच्छवासाचा दर, ऑक्सिजनचे सॅच्युरोशन SPO2 आणि तापमान यांसारख्या रुग्णाच्या महत्त्वाच्या लक्षणांचे सतत निरीक्षण केले जाते. अत्यावश्यक लक्षणांमधील कोणतेही प्रतिकूल बदल झाले तर न्यूरोसर्जनशी सल्लामसलत करून ऍनेस्थेटिस्टद्वारे त्यावर त्वरित उपचार केले जातात. अनपेक्षित रक्तस्त्राव झाल्यास, रक्त दिले जाऊ शकते. (ब्लड ट्रान्सफ्युजन).

शस्त्रक्रियेनंतर:

रुग्णाला त्याच्या शस्त्रक्रियेच्या जखमांमधून बरे होण्यास मदत करण्याची आणि त्याची सामान्य स्थिती परत आणण्याची ही वेळ असते. कोमॅटोज रुग्णामध्ये ऍनेस्थेसिया नंतर शुद्ध येण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांचे अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक असते. रूग्णाच्या शरीरात किती प्रवाही पदार्थ जात आहेत व किती बाहेर येत आहेत (आउटपुट), त्यांचे प्रतिजैविक (अ‍ॅन्टीबायोटीक्स), त्यांचे रक्त गोठू नये म्हणून जरूर असल्यास औषधे, त्यांचे इंट्राक्रॅनियल प्रेशर, त्यांची व्हायटल चिन्हे आणि त्यांच्या सामान्य परिस्थितींसह त्यांचे जीसीएस [जीसीएस खाली समजावले आहे.] निरीक्षण महत्त्वपूर्ण असते. प्रेशर सोर्स टाळण्यासाठी कोमॅटोज रुग्णाला हलवावे लागते, परंतु न्यूरोसर्जन त्याला हलवण्याची परवानगी नाकारू शकतात आणि अशा आव्हानात्मक परिस्थिती सुपर स्पेशालिस्ट्समध्ये वारंवार चर्चा करून योग्ये प्रकारे हाताळल्या जातात.

वरील सर्व एकत्रितपणे पेरीऑपरेटिव्ह रुग्ण व्यवस्थापन म्हणतात.

जीसीएस

न्यूरोलॉजिकल मॉनिटरिंगसाठी जीसीएस स्कोअर हे एक महत्त्वाची तपासणी पद्धत आहे. जीसीएस म्हणजे ‘ग्लासगो कोमा स्केल’. प्रशिक्षित हॉस्पिरटल कर्मचाऱ्यांकडून इमरजन्सी रूम व आयसीयू मध्ये ही प्रणाली वापरून रूग्णाच्या परिस्थितीचा अंदाज बांधला जातो. जीसीएस चा वापर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या वाचण्याच्या (जीवंत राहण्याच्या) शक्यतेचा अंदाज लावण्यासाठी केला जातो. हे जीसीएस तीन घटकांच्या गुणांची बेरीज आहे: ते तीन घटक म्हणजे डोळे उघडणे, तोंडी प्रतिसाद आणि मोटर प्रतिसाद हे होय. जागत्या तंदुरुस्त व्यक्तिमध्ये जीसीएसचा सर्वोच्च स्कोअर १५ असतो, आणि मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णाचा स्कोर सर्वात कमी म्हणजे ३ असतो. १५ चा स्कोअर हे सूचित करतो की रुग्ण पूर्णपणे जागृत आहे, प्रतिसाद देत आहे आणि त्याला स्मृती किंवा विचार यांच्या समस्या नाहीत. स्कोअर जितका कमी असेल तितका कोमा अधिक खोल असेल, आणि रूग्णाची एकूण परिस्थिती बीकट असेल.

कोमॅटोज रुग्णाचा ग्लासगो कोमा स्केल (GCS) स्कोअर सहसा 8 किंवा त्याहून कमी असतो.

एनआयसीयू मध्ये गंभीर काळजी

पेरीऑपरेटिव्ह कालावधीत रूग्णाची सतत काळजी घेण्याचे व्यवस्थापन सतर्क न्यूरोलॉजिकल मॉनिटरिंग आणि जरुर पडल्यास त्वरित हस्तक्षेप करणे या भोवती फिरते. न्यूरोलॉजिकल स्थितीचे सतत मूल्यांकन, ज्यामध्ये डोळ्यातील बाहुल्यांची उजेडाला प्रतिक्रिया, मोटर प्रतिसाद आणि जीसीएस समाविष्ट असतात. सेरेब्रल परफ्यूजन योग्य करण्यासाठी आणि शरीराला दुसरी कुठली इजा टाळण्यासाठी वरील गोष्टी मार्गदर्शक असतात. वरील गोष्टींनुसार सिडेशन किती द्यायचे, व्हेंटिलेटर सेटिंग्ज काय ठेवाव्यात आणि औषधीय हस्तक्षेप कधी व काय करावेत याबद्दल निर्णय घेण्यासाठी वरील मार्गदर्शक खूप उपयोगाचे असतात.

सारांश

एनआयसीयू मधील कोमॅटोज रूग्णांच्या पेरीऑपरेटिव्ह मॅनेजमेंटसाठी सर्वसमावेशक आणि मल्टी-डिसीप्लीनरी दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. त्यामध्ये न्यूरोसर्जिकल उपचार, ऍनेस्थेसिया, उत्कृष्ट नर्सिंग काळजी घेणे आणि न्यूरो-पुनर्वसन यांचा समावेश असतो.

अनेक लोकांना आयसीयूची भीती वाटते. वास्तविक रूग्णांना बरे करण्यासाठी चांगल्या हॉस्पिटलमधील आयसीयू म्हणजे सर्वोत्तम ठिकाण. जर एखादा रुग्ण इंट्यूबेटेड असेल आणि तो व्हेंटिलेटरवर असेल तर त्याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती मरणार आहे. क्रिटीकल केअर तज्ज्ञ रुग्णाची तब्बेत स्थिर करतात व त्यानंतर ते व्हेंटिलेटरने दिलेल्या प्राणवायुचे प्रमाण हळूहळू कमी करून पाहतात आणि शेवटी रुग्ण स्वतःहून श्वास घेऊ शकतो. या प्रक्रियेला ‘विनिंग’ म्हणतात. हे करतांना रुग्णाचा व्हेन्टीलेटर द्वारा ऑक्सिजनचा पुरवठा हळूहळू कमी होतो. अशा प्रकारे सर्जिकल कोमॅटोज रुग्णांवर चांगल्या रुग्णालयात एनआयसीयू मध्ये उपचार केले जातात.